Wednesday, April 23, 2008

बंडाचे झेंडे-भुजबळ,राणे आणि आता मुंडे!!


गोपिनाथ मुंडे यांनी दिलेल्या तडकाफ़डकी राजीनाम्याने भाजपामधेही बंड झाले. हल्ली राजकिय बंड ही गोष्ट सामान्य होत चालली आहे. आपल्याला काहीतरी मिळाव या हेतुने बंड करायच,काहीतरी चटपटीत बातमी मिळायच्या सतत प्रतिक्षेत असलेला मिडीया मग गल्लीपासुन दिल्लिपर्यंत बंड ,त्याचे परीणाम,बंडाने भविष्यात होणारे बदल आणि सर्वात महत्वाच म्हणजे बंडखोर नेता पक्ष सोडणार का व सोडल्यास कुठे जाणार या चर्चा करुन काथ्याकुट करणार हे हल्ली नित्याचच व्हायला लागलय. बंड करण्यामागे 'असु शकणारी कुटनिती' पण चर्चिली जातेच.

बाकी महाराष्ट्राला राजकिय बंड काही नविन नाही. शरद पवारांनी कॉंग्रेसविरुध्द दोन वेळा केलेल,भुजबळांनी सेनेविरुध्द केलेल,विलासराव व सुशिलकुमारांनी पवारांविरुध्द केलेल,राणेंनी व राजनी उध्दवविरुध्द केलेल, अस प्रत्येक राजकिय बंड महाराष्ट्राची राजकिय भुमी हादरवुन गेल. काही बंड सफ़ल तर काही असफ़ल ठरले. पण आपण सध्या फ़क्त गेल्या काही महिन्यात झालेल्या बंडांचा विचार करु. ज्यामधे छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाला केलेल बंड,नारायण राणेंनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरुध्द केलेल आणि परवाच गोपिनाथ मुंडेंनी गडकरींच्या 'किचन कॅबिनेट'विरुध्द केलेल बंड येत. तसेच गेल्या काही महिन्यात दत्ता मेघेंच,कर्नल सुधिर सावंतांच,वैभव नाईकांच वगैरे 'चिल्लर' बंडही झाले.

बाकी महत्वाच्या ३ बंडांमधे फ़क्त मुंडेंचच बंड तस सफ़ल ठरल. भुजबळांनी स्वत:च्या वाढदिवसाला मुंडेंबरोबर कार्यक्रम घेउन व त्यात बाळासाहेबांचे फ़ोटो व शिवसेनेचा काळ वगैरेची आठवण काढुन अघोषित बंडाळी केली. पण नंतर डाळ काही शिजत नाही आणि पवार काही ऐकत नाहीत हे कळल्याने भुजबळ गप्प झाले. पवारांशी पंगा घेण परवडणार नाही हे काय आता भुजबळांना माहीत नसेल का?आधीच शिवसेना विरोधात,कॉंग्रेसशी निष्ठा न दाखवल्याने तिथेही अवघड,त्यात परत राष्ट्रवादीही विरोधात गेली तर आपल राजकीय अस्तित्वच धोक्यात येउ शकत हे माहीत असुनही भुजबळांनी 'नो बाईट ओन्ली फ़ाईट' वगैरे बरळत 'राजकिय भुकंपाचे' तारे तोडले. पण पवारांच्या एका धमकीनेच हे 'तारे जमिन पर' खो गये. बरं आता लढाई करायचीही धमक नाही तर उगच 'लौंगीची लड' फ़ोडुन 'तोफ़खान्याच्या' गर्जना करायच्याच कशाला??बाकी भुजबळांची धुसमुस अधुन-मधुन चालुच असते. त्यात परत बिहार,राजस्थानातल शक्तीप्रदर्शन असत. तिथल्या शक्तीप्रदर्शनाला तिथे कोणी विचारत नाही तर इथे कोण विचारणार???

त्यानंतरच बंड म्हणजे नारायण राणेंनी 'दिल्ली'त जाउन विलासरावांविरुध्द केलेल. हे बंड गुजरातच्या निवडणुकांच्या निकालांच्या एक दिवस आधी करण्यात आल. महाराष्ट्र सरकार जनतेसाठी नाही तर फ़क्त एका व्यक्तीसाठी चालते आहे असे म्हणुन राणेंनी 'सिंहगर्जना' केली आणि वर मी महाराष्ट्राच्या १० कोटी जनतेसाठी बोलतोय वगैरे अस पिल्लुही सोडुन दिल. महाराष्ट्राच्या १० कोटी जनतेची राणेंना काळजी आहे हा 'नविन शोध' कुणालाच पटला नाही. बाकी मागे आपण काय बोललो वगैरेचा विचार न करता काहीही 'ठोकायच' हा राणेंचा स्वभावच आहे. आपण केलेल्या विधानाच्या बरोबर विरुध्द विधान करताना राणेंना काहीच वाटत नाही. बाकी राणेंनी बंड गुजरातच्या निकालांच्या पार्श्वभुमिवर केले होते. मिडीयाने 'मोदी हरु शकतात' असा केलेला प्रचार बहुतेक राणेंना खरा वाटला असावा. कारण मोदी हरले तर ते भाजपातुन फ़ुटुन आलेल्या मोदीविरोधकांमुळेच असे स्पष्ट झाले असते व निष्ठावंतांपेक्षा कॉंग्रेसला पक्षांतर करुन आलेले 'पॉवरफ़ुल' नेते विजय मिळावुन देउ शकतात असे स्पष्ट होउन महाराष्ट्रात 'आपला नंबर' लागेल असे राणेंना वाटले असावे. बाकी राणेंच्या बंडामुळे प्रभा राव या त्यांच्या समर्थकही उघडपणे त्यांच्या विरोधात गेल्या.पतंगरावांनी हाच 'चान्स' साधायचा प्रयत्न केला व राणेंना 'कॉंग्रेसी संस्कृती'चे धडे दिले. बाकी पतंगराव शिक्षणसम्राट असल्याने 'धडे' देणे त्यांना जमते.गुजरातच्या निकालांनंतर 'उपर्‍यांना' मोदींनी झोपवल्याने राणेंचे बंड सफ़ल होण्याचा प्रश्नच उरला नाही व हायकमांडनी राणेंना गप्प केले. पण गप्प झाले तर ते राणे कसले. ते अजुनही दर १० दिवसांनी 'दिल्लीवार्‍या' करतात व दर वारीला मुख्यमंत्री बदलणार अशी अफ़वा उठवुन देतात. पण राणे ताकदवान,धडाडीचे आणि कुटनितीचा अचुक वापर करणारे असल्याने विलासरावांना आज नाही तर उद्या त्यांचा त्रास होणारच आहे.

त्यानंतर परवाच झालेले मुंडेंचे बंड. गडकरी आणि मुंडेंमधले मतभेद पुर्वीपासुन सर्वश्रुत आहेत. गडकरींनी त्यांच्या मंत्रीकाळात रस्तेक्रांती आणली होती,उड्डाण पुल बनवले होते त्यामुळे 'गुड एॅडमिनिस्ट्रेटर' म्हणुन त्यांची ओळख आहे पण त्यांना तसा फ़ारसा 'मास बेस' नाही. मुंडे त्यामानाने 'पॉप्युलर' नेते आहेत. महाजन-मुंडेंमुळे महाराष्ट्रात आज भाजपाच अस्तित्व आहे.पण महाजनांच्या निधनानंतर मुंडेंची चांगलीच अवहेलना चालली होती. त्यांना निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नव्हते.त्यामुळे मुंडेंनी बंडाचे हत्यार उपसले व 'भाजपात लोकशाही राहीली नाही' असे म्हणुन 'किचन कॅबिनेट' सगळे निर्णय घेते म्हणुन सर्व पदांचे राजीनामे दिले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भरभरुन राजीनामे दिले. निवडुन आलेले बहुतेक नेते मुंडेसमर्थक निघाले.मुंडेंनी पहिल्या दिवशी दिल्लीला जाण्यासही नकार दिला. शेवटी आडवानींनी समजुत घातल्यावर मुंडेंनी जास्त नाटक न करता राजीनामे मागे घेतले. या बंडामुळे मुंडेंना 'राष्ट्रीय नेता'च्या नावाखाली महाराष्ट्रातुन संपवण्याचा गडकरींचा डाव मोडीत निघेल असे दिसते. पण निवडणुकांमधे या मतभेदांचा फ़टकाही भाजपाला बसु शकतो.बाकी मुंडेंचे बंड यशस्वी झाले असे प्रथमदर्शी तरी दिसते. मुंडेंची पक्ष सोडायची इच्छा आहे असे कधी वाटले नाही. आपले राजकीय वजन कमी होउ नये म्हणुन मुंडेंनी वेळीच पाउल उचलले.

बाकी वरीलपैकी एकाही बंडाशी जनतेला घेणदेण नाही. जनता इथे कुठेही येत नाही. वैयक्तीक राजकीय स्वार्थासाठी नेते स्वत:च्याच पक्षाविरुध्द बंड करतात पण जनतेसाठी स्वत:च्याच पक्षाविरुध्द 'आर या पार'ची लढाई करणारा नेता दिसत नाही हेच महाराष्ट्राचे व या देशाचे दुर्दैव आहे.